सेंद्रिय शेती - काळाची गरज

आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात अधिकाधिक उत्त्पन्न घेण्याच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे आणि यामुळेच जैवविविधता, जमिनीची सुपीकता आणि पर्यायाने मानवी आरोग्यालाही धोका पोहचत आहे. ह्या वर रामबाण उपाय म्हणजे 'सेंद्रिय शेती'. सेंद्रिय शेतीबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी वनराई मधील संपूर्ण शेती ही नैसर्गिक पद्धतीचीच असेल. फळे व भाजीपाला, भात, मसाले, गहू, कापूस, चहा इ. पिके उत्तमरीत्या सेंद्रिय शेती द्वारे उत्पादित करता येतात.

सेंद्रिय शेती का गरजेची आहे ?

अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी रासायनिक शेतीमध्ये वापरली जाणारी रसायने ही पिकांच्या उत्पादनात व धान्यात मिसळली जातात. ज्या वेळेस असे धान्य किंवा फळे आपण खातो तेव्हा त्यांच्यामध्ये असलेली विषारी द्रव्ये व रसायने आपल्याही पोटात जातात आणि अनेक नवनवीन आजारांची आपल्या शरीराला कालांतराने लागण होत जाते आणि याचा एकूणच परिणाम आपल्या सुदृढ जीवनमानावर निश्चितच होतो. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या ह्या रासायनिक शेतीचे परिणाम आता स्वतः शेतकरीही भोगत आहेत आणि म्हणूनच सेंद्रिय शेती द्वारे उत्पादित केलेल्या मालाला प्रचंड मागणी येत आहे. सेंद्रिय शेती हीच काळाची गरज आहे हे शेतकरी व सामान्य लोकांनाही पटत आहे आणि म्हणूनच सेंद्रिय शेतीच शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणू शकते.

सेंद्रीय शेतीची चार मूलभूत तत्त्वे

आरोग्य तत्व : सेंद्रिय शेती ही आरोग्य राखणारी असून त्याद्वारे माती, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य यांचे जतन केले जाते. ही शेती मानसिक, शारीरिक, पर्यावरणीय आणि समाजकल्याणचा समतोल राखण्यास मदत करते.
न्याय तत्व : सेंद्रिय शेतीमध्ये नैसर्गिक संसाधने चतुराईने वापरली जातात आणि त्यामुळे मनुष्य व इतर जिवंत प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. सेंद्रिय शेती जीवनमानाचा दर्जा उंचावते आणि निसर्गाची हानी रोखून तो पुढच्या पिढीसाठी राखून ठेवते.
पर्यावरणीय समतोल तत्व : पर्यावरणाच्या अनेक साखळ्या ह्या एकमेकांवर अवलंबून असतात आणि म्हणूनच सेंद्रिय शेती ह्या पर्यावरणीय चक्रांचा योग्य समतोल राखण्यास मोलाची मदत करते .
दूरदृष्टी तत्व : उपस्थित निसर्गाचे फायदे व त्यांचे काळजीपूर्वक संवर्धन होत असल्यामुळे सेंद्रिय शेती भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी समृद्ध निसर्ग वारसा जातं करते.

सेंद्रिय शेती चे फायदे

सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे जमिनीला नत्राचा पुरवठा होतो आणि त्यामुळे पिकांची चांगली वाढ होते.
सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व त्यामुळे जमिनीची धूपही होत नाही आणि यामुळेच जमीन वर्षानुवर्षे सुपीक राहण्यास मदत होते.
सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचा कस राखण्यास योग्य मदत होते आणि यामुळेच जमिनीतील आम्ल, विम्ल व क्षार यांचे प्रमाण योग्यरीत्या राखले जाते.
सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची क्षारांची अदलाबदल करण्याची क्षमता वाढते आणि याचा उपयोग झाडांना संतुलित पोषक द्रव्य मिळण्यात होतो.
सेंद्रिय खते व पदार्थांमध्ये कर्ब किवा कार्बन यांची योग्य मात्रा उपलब्ध असल्याने जमिनीतील असंख्य पोषक जीवाणूंना त्याचा उपयोग होतो आणि हेच जीव जमिनीतील अन्नद्रव्य पिकांना व झाडांना पुरवितात.
सेंद्रिय पदार्थ तापमानाचा योग्य संतुल राखण्यासही मदत करतात कारण उष्ण तापमानात जमीन थंड ठेवण्यास व थंड तापमानात जमीन उबदार ठेवण्यास सेंद्रिय खते मदत करतात.
रासायनिक खतांचा कोणताही वापर होत नसल्याने सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणारे अन्नपदार्थ ही बिनविषारी असतात.
पर्यावरणाचे कालचक्र हे वनस्पती, प्राणी आणि कीटक ह्यांच्यावर अवलंबून आहे आणि ह्यातील कोणत्याही घटकांचा सेंद्रिय शेतीने ऱ्हास होत नसल्याने पर्यावरणीय समतोल राखला जातो.