शेतीपूरक व्यवसाय - स्वावलंबत्वाचा उत्तम पर्याय

निसर्ग संवर्धन म्हणजे फक्त शेती करणे किंवा फळझाडे, आयुर्वेदिक वनस्पती व मसाले वनस्पती यांची लागवड करणे एवढेच नसून जैवविविधता टिकविण्यासाठी पशु व पक्षांची सुद्धा योग्य प्रमाणात उपलब्धता असणे गरजेचे आहे. वनराई मध्ये शेतीपूरक अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध असतील ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी आवश्यक ती खते जागेवरच निर्माण केली जातील. गो-पालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम कीटक पालन, फळ प्रक्रिया उद्योग इ. अनेक प्रकारचे शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व साहाय्य करू.

शेतीपूरक व्यवसायांची गरज

पारंपरिक पद्धतीने करत असलेल्या शेतीवरच अवलंबून न राहता खात्रीशीर व नियमित उत्पन्नासाठी शेतीला पूरक असे जोडधंदे करणे ही खरी काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखूनच आम्ही शेतीपूरक विविध व्यवसायांना वनराईमध्ये प्रोत्साहन देत आहोत. बदललेले निसर्गचक्र, पाण्याची उपलब्धता, शेतमालाला मिळणारा भाव ह्यांचा विचार केला असता प्रत्येक शेतकऱ्याने शेतीला अनुसर जोडधंदा केल्यास त्याला हमखास उत्पन्न प्राप्त होते असा निकष अनेक संशोधनातून मांडण्यात आला आहे. शेतीपूरक व्यवसायांमध्ये गो-पालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम कीटक पालन, मधमाशी पालन, परसबाग, मशरूम उद्योग, फळे व फुले प्रक्रिया उद्योग इ. चा प्रामुख्याने समावेश होतो.

शेतीपूरक व्यवसायाचे फायदे

शेतीपूरक उद्योगातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे शेतकऱ्याला इतर शेतीकामांसाठी आर्थिक आधार मिळतो.
शेतीपूरक व्यवसायासाठी आवश्यक भांडवलासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज पडत नाही कारण शेतीपूरक व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हेच त्याच्यासाठी खेळते भांडवल असते.
सेंद्रिय शेती साठी आवश्यक असणारी विविध खते ही गो-पालन, शेळी पालन केल्यामुळे त्यांच्या मलमूत्रातूनच स्वतःच्या शेतातच तयार करता येतात.
शेतीपूरक व्यवसायातून वाढ होत जाणाऱ्या प्राणी व इतर कीटकांमुळे जैवविविधतेचा समतोल राखण्यास मोलाचा हातभार लागतो.
शेण व गोमूत्रामुळे रासायनिक खताला सोयीस्कर पर्याय प्राप्त होतो यामुळे शेतीचाही खर्च कमी होतो आणि पर्यायाने रासायनिक खतांचा वापर टाळल्याने पिके चांगली येतात.
शेतीपूरक व्यवसायासाठी मनुष्यबळ लागते व त्यामुळेच तरुणांना व महिलावर्गाला रोजगाराची संधी उपलब्ध होते.

आमचा विशेष उपक्रम - गो-पालन

आमचा एक साधा प्रश्न आहे - तुमच्यापैकी किती जण खरोखर गायींचे संगोपन किंवा त्यांचे पालन व त्यांची वाढ याबद्दल विचार करतात कारण आपल्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांचा गायीशी संबंध तेव्हाच येतो जेव्हा एक ग्लास दूध पिणे असो किंवा एखाद्या सणाला गोठ्यातील गायीला नैवेद्य दाखवणे असो. आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात आपण अधिकाधिक शहरीकरण आणि जागतिकीकरणाकडे वाटचाल करीत असताना कमी होत चाललेल्या गोठ्यांच्या संख्येकडे किंवा दुग्ध व्यवसायांकडे कानाडोळा करत आहोत आणि असेच आणखी काही वर्ष सुरू राहिल्यास दुधाचा सर्वात मोठा जागतिक निर्यातदार म्हणून असलेला आपल्या देशाचा दबदबा कमी होऊन कदाचित अव्वल दूध आयातदार म्हणूनही आपले नाव येऊ शकेल अशी भीती अनेक जाणकार दुग्ध व्यावसायिक आणि शास्त्रज्ञ यांनी सुद्धा मांडली आहे. परंतु आम्ही अशा लोकांच्या गटामध्ये नाही जे फक्त वरील विषयांवर चर्चा करतात आणि एकदा चर्चा संपल्यानंतर ती सोडून आपल्या मार्गाला लागतात. आम्ही सच्चे निसर्ग प्रेमी, कष्टाळू शेतकरी आणि विशेष म्हणजे मनापासून गायप्रेमी आहोत आणि म्हणूनच आम्ही नेहमी भारतीय वंशाच्या गायींचे प्रजनन, संरक्षण आणि विकास करण्यासाठी एक विशेष क्षेत्र आमच्या प्रत्येक प्रकल्पात राखीव ठेवतो जे की ह्या प्रकल्पात निश्चितच असेल.

आमच्या गो-पालन प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
पूर्णतः विकसित गाय-निवारा
भटक्या व भारतीय प्रजातीच्या गायींसाठी आरोग्यदायी राहण्याची जागा
आपल्या प्रकल्पातूनच तयार होणाऱ्या सेंद्रिय भाज्या, फळे ह्यांच्या टाकाऊ घटकांचा तसेच विकसित केलेल्या कुरणांचा चारा म्हणून वापर
नियमित आरोग्य तपासणी
दूध काढण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी
दुग्ध उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी विशेष नैसर्गिक उपकरणे
गोठ्यात गोळा होणारे शेण हे प्रकल्पातील सेंद्रिय शेती साठीच शेणखत म्हणून वापरले जाईल.

आमची नम्र विनंती - कोणीही व्यक्ती अथवा संस्था ज्यांना खरोखरच गायींचे संगोपन किंवा पालन करायचे आहे पण जागेची कमतरता किंवा अन्य कारणांमुळे ते शक्य नाही असे लोक त्यांच्या गायी आमच्याकडे हस्तांतरण करू शकतात व वेळोवेळी प्रकल्पाला भेट देऊन त्यांची आम्ही करत असलेल्या गो-सेवेची खात्री करू शकतात.