नमस्कार मित्रहो,

आमच्याबद्दल माहिती मिळविण्याआधी थोडं हे वाचा.

तुमच्या घराच्या आसपास सद्य परिस्थितीत किती नवीन पक्षी तुम्हाला पाहायला मिळाले? नवीन सोडा पण चिमणी, साळुंकी, पोपट हे तरी तुम्ही अनेक दिवसांपासून पाहिले आहेत का? तुमच्या आसपास वड, पिंपळ इ. भारतीय प्रजातीची किती महावृक्ष तुम्ही पाहिले आहेत? अश्या किती तरी साध्या आणि सोप्या, निसर्गाशी निगडित प्रश्नांची उत्तरे नकारात्मकच मिळतील आणि ह्याला जबाबदार आपणच आणि हे चित्र ही बदलणारे आपणच. 'थोडे द्यावे आणि थोडे घ्यावे' हा निसर्ग नियम विसरून जागतिकीकरणाच्या नावाखाली आपण 'काहीच न देता सर्व मिळावे' ह्या वृत्तीकडे सरकलो आहोत.

पण आपल्यातील अनेक जण असेही असतील ज्यांना हे चित्र बदलायचे आहे. आम्हीही त्या ‘बदल’ घडविण्याच्या समूहातीलच असून निसर्गाची वाढ व त्याचे संवर्धन हा आमचा ध्यास असून आम्ही यापूर्वी पूर्ण केलेल्या अनेक प्रकल्पांमधून आमच्या निसर्गप्रेमाच्या संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आणल्या आहेत. चला तर मग, आपल्या पुढच्या पिढीसाठी समृद्ध असा निसर्ग आजपासूनच साकार करूयात.

आमचे उद्दिष्ट :

“निसर्गसंवर्धन ही आता फक्त काळाची गरज राहिली नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी निसर्ग राखणे ही आता आपली नैतिक जबाबदारी झाली आहे आणि याची जाणीव ठेवनूच हरतऱ्हेने निसर्गाची सेवा करत राहणे हेच आमचे मूळ उद्दिष्ट आहे.”


आमचे ध्येय :

“निसर्गसंवर्धनाचा एक प्रयत्न म्हणून शेती करणे व ती राखणे हा आमचा मूळ उद्देश असून त्यासाठी जास्तीत जास्त जमीन शेतीयोग्य करणे, त्यावर फळ झाडांची लागवड करणे, वृक्ष संवर्धन करणे, शेतीसोबतच निसर्ग सान्निध्यात राहण्यायोग्य फार्म हाऊसेस व जोडीला हमखास उत्त्पन्न स्रोताची निर्मिती करणे.”


आमची फार्म हाऊस ची संकल्पना

फार्म हाऊस हे फक्त एक विरंगुळ्याचे ठिकाण नसावे तर तिथे असावा खरा-खुरा निसर्ग सहवास ज्यामागे असेल निसर्गसंवर्धनाचा मनापासून ध्यास. आमचे फार्म हाऊस हे महिन्यातून कधीतरी येऊन धांगड-धिंगाणा घालून निसर्गाची वाताहात करून शहरी जीवनमानात जाऊन 'निसर्ग कोण वाचवणार' ह्या वर गरळ ओकत बसण्यासाठी नक्कीच नसेल. तर तो असेल आत्ताच्या व येणाऱ्या पुढील अनेक पिढींसाठी एक आदर्श निसर्गप्रेमाचा नमुना. स्वागत कमान म्हणून ताठ मानेन उंच उभी असलेली नारळाची झाडे, अंगणात असेल मांगल्याचे प्रतीक असलेली तुळशी वृंदावन, दारावर असेल वेलीचे तोरण, संपूर्ण घर असेल नैसर्गिक सामानाने परिपूर्ण, बंगल्याच्या सभोवताली असेल बांबूचे संरक्षक कठडे, मागील बाजूस असेल हिरवाईने नटलेली सेंद्रिय शेती, हवा शुद्ध करण्यासाठी अनेक आयुर्वेदिक वनस्पती, मनाला प्रसन्न करणारी आमराई, पक्ष्यांचा किलबिलाट, दुभती जनावरे आणि सुखी आयुष्यासाठी सतत सोबतीला असणारा निसर्ग.

'वनराई' मध्ये हे स्वप्न नसेल हे सत्य असेल...